चेंबूरमधील सरकारी वस्तीगृहातून पाच अल्पवयीन मुलांचे पलायन
चेंबूरमधील सरकारी वस्तीगृहातून पाच अल्पवयीन मुलांचे पलायन
लेवाजगत न्यूज मुंबई-न्यायालयाच्या आदेशानुसार चेंबूरमधील सरकारी वस्तीगृहात वास्तव्यासाठी ठेवण्यात आलेल्या पाच अल्पवयीन मुलांनी पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
रेल्वे स्थानक अथवा इतर ठिकाणी सापडणाऱ्या अल्पवयीन मुलांची न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांमार्फत शासकीय वस्तीगृहात तात्पुरती निवाऱ्याची सोय करण्यात येते. चेंबूर नाका येथील आदित्य बिर्ला सरकारी वसतीगृहात अशाच प्रकारे काही महिन्यांपूर्वी अनेक मुलांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यापैकी पाच मुलांनी आठ दिवसापूर्वी वस्तीगृहाची संरक्षक भिंत ओलांडून पलायन केल्याचे निदर्शनास आले आहे. ही सर्व मुले १३ ते १७ वयोगटातील आहेत.
ही बाब लक्षात आल्यानंतर वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांनी याबाबत चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून पोलीस या मुलांचा कसून शोध घेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत