अवैध धंदे शेगाव व खामगाव तालुक्यातील बंद करा माजी आमदार सानंदा यांची मागणी
अवैध धंदे शेगाव व खामगाव तालुक्यातील बंद करा- माजी आमदार सानंदा यांची मागणी
लेवाजगत न्यूज खामगाव -खामगावचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांची नागपूर येथे बदली झाल्यानंतर खामगाव व शेगाव तालुक्यात अवैध धंदे वाढले आहेत. या अवैध धंद्यांमुळे शेतकरी, तरुण वर्ग बरबाद होत आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याने पोलिस विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खामगाव व शेगाव तालुक्यांतील सुरू असलेले अवैध धंदे त्वरित बंद करावे. अन्यथा विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी दिला. येथील पत्रकार भवनात गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
दिलीपकुमार सानंदा यांनी सांगितले की, खामगाव शहरासह तालुक्यात तसेच शेगाव शहर व तालुक्यात वरली, मटका, एक्का बादशाह जुगार, चक्री वरली, रेतीची तस्करी, अवैध गुटखा विक्री, क्रिकेटचा सट्टा, अवैध बायोडिझेलची विक्री यासारखे अवैध धंदे खुलेआमपणे सुरू आहेत. अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस शहराध्यक्षा सरस्वती खासणे, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे आणि शेगाव तालुकाध्यक्ष विजय काटोले यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने १९ डिसेंबर रोजी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांची भेट घेतली व अवैध धंदे सुरू असलेल्या प्रत्यक्ष ठिकाणाबाबत नावानिशी लेखी तक्रार दिली.
यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांनी सुरू असलेले अवैध धंदे दोन दिवसात बंद करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. अवैध धंदे वाढत असल्यामुळे शांतता भंग होऊन वेळप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन खामगाव व शेगाव तालुक्यातील अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. या नंतरही अवैध धंदे बंद न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी सानंदा यांनी दिला.
अवैध धंद्यांचा पाठीराखा कोण: खामगाव व शेगाव तालुक्यात अवैध धंदे बोकाळले असून हे धंदे बंद करण्याऐवजी उलट काही भ्रष्ट पोलिस अधिकारी व कर्मचारी हप्ते वसुली करण्यात मशगूल आहेत, असा आरोप सानंदा यांनी पत्रकार परिषदेत केला. पोलिस विभागाने ठरवले तर एका दिवसात सर्व अवैध धंदे बंद होऊ शकतात. मात्र लोकप्रतिनिधींचा अवैध धंदे सुरू ठेवण्यास पाठिंबा तर नाही ना अशी शंका माजी आमदार सानंदा यांनी व्यक्त करत अवैध धंद्यांचा पाठीराखा कोण असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत