“आक्रमकपणा सोडू नका, अधिवेशनात जोमाने प्रश्न मांडा”, उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना
“आक्रमकपणा सोडू नका, अधिवेशनात जोमाने प्रश्न मांडा”, उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना
वृत्तसंस्था नागपूर - १९ डिसेंबरपासून नागपुरात महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विविध भ्रष्टाचाराची प्रकरणं, दिशा सालियन, सुशांतसिंह राजपूत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आदि मुद्द्यांवर हे अधिवेशन गाजलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित नागपूर एनआयटी भूखंड घोटाळा आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संबंधित गायरान जमीन घोटाळ्यावरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले. महाविकास आघाडीने अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.
अधिवेशनातील आजचं कामकाज संपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी सभागृहात मांडलेल्या भूमिकेबद्दल आमदारांचं कौतुक केलं. तसेच सभागृहातील आक्रमकपणा सोडू नका, जनतेचे प्रश्न जोमाने मांडा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिल्या आहेत. याबाबतची माहिती ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
संबंधित बैठकीबाबत अधिक माहिती देताना सचिन अहिर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात पार पडलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. शिवसेनेचा एक व्यक्ती म्हणून आपण जेव्हा मुद्दा घेऊन भांडत असतो, तेव्हा संपूर्ण पक्षाची ताकद त्याच्या पाठीशी असते. आमदारांची संख्या किती आहे? हे फारसं महत्त्वाचं नसतं. तुम्ही कोणता विषय मांडता, हे महत्त्वाचं असतं. असे प्रश्न आपण जोराने मांडले पाहिजेत, अशी भूमिका उद्धव ठाकरेंची होती.
“गेल्या आठवड्यात पक्षातील आमदारांनी विधिमंडळात केलेल्या कामाचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं. संख्या कमी असूनही आपण जनतेचे प्रश्न मांडले. विधानपरिषदेतही आपली लोकं आहेत, पण त्यांना प्रश्न मांडण्याची संधीच दिली जात नाही, त्याबद्दल खंतही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली,” अशा माहिती आहिर यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत