Header Ads

Header ADS

‘पठान’मधली दृश्ये, गाणी बदला! परिनिरीक्षण मंडळाची निर्मात्यांना सूचना; चित्रपट नव्याने परीक्षणासाठी पाठवण्याचे आदेश

 

‘पठान’मधली दृश्ये, गाणी बदला! परिनिरीक्षण मंडळाची निर्मात्यांना सूचना; चित्रपट नव्याने परीक्षणासाठी पाठवण्याचे आदेश

चित्रपट नगरी न्यूज-मुंबई : शाहरूख खान-दीपिकाच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘पठान’ चित्रपटात परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) काही बदल सुचविले आहेत. चित्रपट आणि गाण्यात सुचवलेले बदल करून नव्याने चित्रपट परीक्षणासाठी पाठवण्याची सूचना मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी गुरुवारी यशराज प्रॉडक्शनला दिले आहेत.


चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू असलेला वाद आणि बहिष्कार टाकण्याची भाषा यामुळे ‘पठान’ चर्चेत आला आहे. चार वर्षांच्या खंडानंतर रुपेरी पडद्यावर नायक म्हणून पुनरागमन करण्यासाठी सज्ज असलेल्या शाहरूखच्या चित्रपटाभोवती वादाचे मोहोळ उठले आहे. गाण्यात भगव्या रंगाची बिकीनी घालून दीपिका आणि शाहरुखने हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आक्षेप एका मोठय़ा वर्गाने घेतला आहे. त्यातच आता परीक्षणासाठी परिनिरीक्षण मंडळाकडे पोहोचलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट अधिक बिकट झाली आहे.


मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी गुरुवारी याबाबत निवेदन दिले. मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चित्रपट परीक्षणाची प्रक्रिया कसून पार पाडली जात आहे. समितीने ‘पठान’ चित्रपटात आणि गाण्यात काही बदल सुचवले आहेत. ते बदल करून चित्रपट प्रदर्शनाआधी नव्याने परीक्षण समितीकडे पाठवण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. चित्रपटकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातील विश्वास कायम राहिला पाहिजे, त्या दृष्टीने चित्रपटकर्मीनीही प्रयत्न केले पाहिजेत, असे जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, मंडळाने सुचवलेले बदल नियमाला धरून नसल्याची प्रतिक्रिया माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी दिली. सेन्सॉर बोर्डावर मंत्र्यांकडून दबाव आला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, असा दावा त्यांनी एका मुलाखतीत केला. मंडळाने याच गाण्याच्या ट्रेलरला प्रदर्शनाची परवानगी दिली होती, ही बाब निहलानी यांनी अधोरेखित केली.


भांडारकर, भन्साळींचे चित्रपटही वादात


या वर्षभरात संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंडिया लॉकडाऊन’ हे दोन चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडले. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात चार बदल सुचवण्यात आले होते. शिवाय, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासंदर्भातील चित्रपटातील प्रसंगातही बदल सुचवण्यात आले होते. थेट ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटात बारा बदल सुचवण्यात आले होते.

    ‘पठान’ चित्रपट वादाचा बळी ठरत आहे.  दबावाखाली परिनिरीक्षण मंडळाने हा निर्णय घेतला असावा. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून मंत्रालयाकडून मंडळाला पत्रे पाठविली जातात. मात्र, एखाद्या रंगामध्ये बदल करावा, अशी कोणतीही मार्गदर्शक सूचना नाही. बीभत्सपणा किंवा अश्लीलता असल्यास तुम्ही बदल सुचवू शकता.     


पहलाज निहलानी, माजी अध्यक्ष, चित्रपट परिनिरीक्षण मंडळ


चित्रपटकर्मीची सर्जनशील अभिव्यक्ती आणि प्रेक्षकांची संवेदनशीलता या दोन्हींचा योग्य समतोल साधला जावा, यासाठी मंडळ  कटिबद्ध आहे. आपली संस्कृती अत्यंत वैभवशाली आहे. त्यामुळे कुठल्यातरी क्षुल्लक गोष्टींमुळे वास्तवाबाबत लोकांची दिशाभूल होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. – प्रसून जोशी, अध्यक्ष, चित्रपट परिनिरीक्षण मंडळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.