मातोश्रीवरच ठाकरेंना 'आव्वाज' ऐकवणार, वांद्र्यातील मैदानात शिंदे गटाचा दसरा मेळावा?
मातोश्रीवरच ठाकरेंना 'आव्वाज' ऐकवणार, वांद्र्यातील मैदानात शिंदे गटाचा दसरा मेळावा?
लेवाजगत न्युज मुंबई:-शिवाजी पार्क मैदानावर बहुचर्चित दसरा मेळावा कोण घेणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही, मात्र शिवतीर्थावरील मेळाव्याची संधी हुकली, तर पर्याय म्हणून शिंदे गटाने बॅकअप प्लॅन तयार ठेवल्याची माहिती आहे. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानासाठी मुख्यमंत्र्यांतर्फे अर्ज करण्यात आल्याची माहिती आहे.
आधी शिवसेना भवनाच्या अंगणात अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्क, ज्याला ठाकरेंच्या भाषेत 'शिवतीर्थ' संबोधलं जातं, तिथेच दसरा मेळावा घेण्याचा शिंदे गटाचा आग्रह होता. ही रस्सीखेच होत असतानाच राजकीय वातावरण चांगलंच तापलं. मात्र शिवसेनेने कोर्टात जाण्याची तयारी दाखवल्याने शिवाजी पार्कच्या मैदानात जर दसरा मेळावा घेता आला नाही, तर पर्याय म्हणून शिंदे गटाने बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानासाठी अर्ज केला आहे.
म्हणजेच आता 'मातोश्री'च्या अंगणातच दसरा मेळावा घेण्याच्या शिंदेंच्या हालचाली आहेत. उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीपासून बीकेसीतील मैदान अवघ्या काही अंतरावर आहे. त्यामुळे ठाकरेंना त्यांच्या घरातच आपला आवाज ऐकवण्याचा शिंदेंचा इरादा दिसत आहे.
मे महिन्यात शिवसेनेच्या संपर्क अभियानात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं होतं. याच मैदानात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला आवाज घुमवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. शिवसेना पक्ष, धनुष्यबाण निवडणूक चिन्ह यावर दावा सांगितल्यानंतर शिवसेनेची आयकॉनिक निशाणी असलेला दसरा मेळावाही हायजॅक करण्याची एकनाथ शिंदेंची योजना असल्याचं दिसतंय.
शिवाजी पार्क का हुकणार?
शिवाजी पार्कबाबत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हे मुंबई महापालिकेचं धोरण आहे. त्यानुसार आधी अर्ज करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या गटाला मैदान मिळू शकतं. त्यामुळे नामुष्की टाळण्यासाठी एमएमआरडीए मैदानाचा पर्याय शिंदेंनी तयार ठेवलाय.
राज ठाकरेंना निमंत्रणाची चर्चा
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बोलावलं जाण्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांची भाजप नेत्यांशी जवळीक वाढत आहे. त्यामुळे शिंदे-भाजप-मनसे अशी महायुती होणार असल्याचंही बोललं जात आहे. अशात राज ठाकरेंनी शिंदेंच्या व्यासपीठावर हजेरी लावल्यास त्याचे उघड संकेत मिळतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत