मुलींसाठी सायबर सुरक्षा शिष्यवृत्ती काय आहे जाणून घ्या
मुलींसाठी सायबर सुरक्षा शिष्यवृत्ती काय आहे जाणून घ्या
लेवा जगत शैक्षणिक विशेष न्यूज -सध्या जगामध्ये सायबर सुरक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञांची कमतरता जाणवते आहे. जवळपास २७ लाख तज्ज्ञांची गरज आहे. ही बाब लक्षात घेता या क्षेत्रात महत्वाकांक्षी तरुणींना करिअरच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. त्यासाठी त्यांना चांगल्या संस्थेतून या विषयाचं शिक्षण – प्रशिक्षण घ्यावं लागेल. हे प्रशिक्षण घेणं सुलभ व्हावं यासाठी सेंटर फॉर सायबर सेफ्टी ॲण्ड एज्युकेशन या संस्थेमार्फत, वुमेन्स सायबर सिक्युरिटी स्कॉलरशीप, ही शिष्यवृत्ती दिली जाते.
या शिष्यवृत्तीची घोषणा १४ नोव्हेंबर २०२२ रोजी केली जाईल. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख- २० फेब्रुवारी २०२३ ही आहे.
या शिष्यवृत्ती अंतर्गत १ हजार ते ५ हजार डॉलर्सचं अर्थसहाय्य दिलं जातं. ही रक्कम थेट संबंधित शैक्षणिक संस्थेकडे पाठवली जाते.
अर्हता-(१) संबंधित महिला उमेदवाराने सायबर सिक्युरिटी, इन्फॉर्मेशन ॲश्युरन्स किंवा अशासारख्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला असावा.(२) उमेदवाराने किमान पदवी प्राप्त केलेली असावी.(३) संबंधिताला अंतिम परीक्षेत ४ च्या प्रमाणावर (स्केल) ३.३ जीपीए (ग्रेड पॉईंट ॲव्हरेज) मिळणं आवश्यक किंवा या प्रमाणकाशी तुलना होऊ शकेल अशी श्रेणी.ही शिष्यवृत्ती कोणत्याही देशातील महिलेला मिळू शकते. अभ्यासक्रम ऑनलाईन किंवा कॅम्पसमध्ये राहून करता येतो. अभ्यासक्रम पूर्णकालीन अथवा अर्धकालीन असू शकतो. अमेरिकेत अथवा इतरत्र राहून हा अभ्यासक्रम करता येतो.
अर्जासोबत पुढील महत्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात.
(१) अर्ज केलेल्या उमेदवारांनी नजिकच्या काळात ज्या शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतले असेले त्यांचे पत्र (ट्रान्सस्क्रिप्ट्स),(२) एखाद्या मान्यवराकडून शिफारसपत्र जोडावे लागेल. यामध्ये संबंधित व्यक्ती तुम्हास किती वर्षापासून आणि कोणत्या क्षमतेत ओळखते? अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कोणते कौशल्य किंवा क्षमता तुमच्याकडे आहे? तुमच्याबद्दल इतर महत्वाची माहिती,यांचा समावेश असावा.(३) शैक्षणिक अर्हतेची माहिती/ गोषवारा-तीन पृष्ठांमध्येच हवा.(४) स्वत:बद्दलची माहिती देणाऱ्या काही प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील- उदा- (अ) हा अभ्यासक्रम निवडण्याची कारणे, (ब) तुम्हाला शिष्यवृत्तीची गरज का आहे? (क) तुमची व्यक्तिगत आणि शैक्षणिक माहिती, (ड) सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रम करण्यासाठी तुम्हाला कुणी प्रोत्साहित केलं? (इ) तुमचं या क्षेत्रातील भविष्यातील उद्दिष्ट्य काय? (ई) तुमचं शिक्षण संपल्यावर तुम्ही या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या महिलांना कशाप्रकारे अर्थसहाय्य करु शकाल? (फ) सायबर सिक्युरिटी संदर्भात तुम्ही आधी काही कार्य केले आहे का?
निवड प्रक्रिया
उमदेवारांची निवड करताना त्याची या क्षेत्रासाठी असलेली आवड किंवा पॅशन, गुणवत्ता आणि आर्थिक निकड या बाबी लक्षात घेतल्या जातील.या शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी अर्ज करावा लागेल.
संपर्क संकेतस्थळ- iamcybersafe.org/scholarships/womens-scholarships,ईमेल- scholarships@isc2.orgभ्रमणध्वनी- ७७४९३३५८७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत