मुंबईत विजांच्या कडकडाटात तुफान पाऊस विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडल्याने घरी परतणाऱ्या नोकरदारांची तारांबळ
मुंबईत विजांच्या कडकडाटात तुफान पाऊस
विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडल्याने घरी परतणाऱ्या नोकरदारांची तारांबळ
लेवाजगत न्यूज मुंबई, ठाणे, पुणे :- मध्य आणि दक्षिण भारतासह महाराष्ट्रात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, बुधवारी सायंकाळी मुंबई, ठाण्याला पावसाने तडाखा दिला. त्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आणि कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले.
गेल्या आठवडय़ात मुंबई, ठाण्यासह राज्यातील बहुतांश भागांत दिवसाच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा राज्यात सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले. मुंबई शहर आणि उपनगरांत बुधवारी दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळच्या सुमारास जोर धरला. विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडल्याने घरी परतणाऱ्या नोकरदारांची तारांबळ उडाली. बुधवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत मुंबई शहरातील सी वॉर्डमध्ये १८ मिमी, मलबार हिल येथे १७ मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात मुलुंड येथे २८ मिमी, एस वॉर्डमध्ये २७ मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे गणेश दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांचा हिरमोड झाला.
ठाणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपले. ठाणे शहरात २० ते २५ मिनिटांत सुमारे ३२ मिमी पावसाची नोंद झाली. शहरात पातलीपाडा, खारेगाव आणि कोपरी या तीन ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. गोखले रोड, नौपाडा यासारख्या महत्त्वाच्या रस्त्यांवर साचले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन जनजीवन विस्कळीत झाले. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरलाही पावसाने तडाखा दिला़.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागांत पुढील पाच ते सहा दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस सक्रिय राहणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवसापासून म्हणजेच ९ सप्टेंबरपासून कोकण, पश्चिम-उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढणार आहे. ९ सप्टेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे.
अतिवृष्टीची भीती..
पुढील पाच दिवस राज्याच्या अनेक भागांत पाऊस पडणार असून, अनंत चतुर्दशीच्या दिवसापासून कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भात काही भागांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण विभागात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
पूर्व विदर्भात रौद्र रूप
नागपूर : बुधवारी सायंकाळपासून नागपूरसह पूर्व विदर्भात काही ठिकाणी तब्बल तासभर आकाशात विजांचे तांडव सुरू होते. त्याला पावसानेही साथ दिली. नागपूरसह भंडारा जिल्ह्यात मंगळवारी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. वर्धा, अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
पाऊसभान..
महाराष्ट्रासह मध्य आणि दक्षिण भारतामध्ये पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. सध्या मोसमी पावसाची आस पुन्हा मूळ जागी म्हणजे मध्य भारतापासून दक्षिण दिशेकडे स्थिरावत आहे. त्यामुळे या भागांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. ९ सप्टेंबरच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे दक्षिणेकडे कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढू शकतो.
जोर कुठे?
अनंत चतुर्दशीपासून राज्याच्या काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत जोरदार पावसाचा अंदाज आहे. याच कालावधीत रायगड, रत्नागिरीत काही भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांत ९ ते ११ सप्टेंबर या कलावधीत जोरधारांची शक्यता आहे. नाशिक, धुळे, नांदेड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आदी जिल्ह्यांतही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.
दक्षिणेत हाहाकार..
महाराष्ट्रासह सध्या दक्षिणेकडील कर्नाटक, केरळ आदी राज्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. बेंगळुरू येथील पाऊसहालाची चित्रे गेल्या काही दिवसांपासून देशभर गाजत आहेत. तेथे आणखी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत