चहा घेत असतानाच गळ्यावर वार, भर चौकात मित्राच्या वडिलांना संपवलं
चहा घेत असतानाच गळ्यावर वार, भर चौकात मित्राच्या वडिलांना संपवलं
लेवाजगत न्युज हिंगोली:-एकेकाळी मेट्रो सिटीमध्ये होणाऱ्या घटना आता गाव खेड्यामध्ये सुद्धा घडू लागल्या आहेत. सिनेमा त्याचबरोबर युट्युबवरील क्राईम स्टोरी पाहून आणि त्याचे अनुकरण करत हत्येच्या घटना हिंगोली जिल्ह्यात सुद्धा घडू लागले आहेत. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे. दिवसाढवळ्या खून, दरोडा यासारख्या घटनांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोलीत एका २२ वर्षीय तरुणाने भर चौकात चाकूने सपासप वार करुन मित्राच्या वडिलाची निर्घृण हत्या केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील गौतम कोंडबा नरवाडे या ५५ वर्षीय इसमाचा खंजीरने गळा कापून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. यानंतर गावात जाऊन आखाडा बाळापूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी मृताच्या नातेवाईकांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत बाळापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको सुरू केल्याने गोंधळ उडला होता.
शेवाळा येथील गौतम नरवाडे हे चौकातील एका हॉटेलमध्ये सकाळी दहा वाजता चहा पित बसले होते. यावेळी शेख मुस्तफा शेख जिलानी हा युवक तेथे आला. त्याने काही कळायच्या आता नरवाडे यांचा खंजरने गळा कापून त्यांच्या छातीत दोन ते तीन वार केले. यानंतर तो तेथेच थांबला. लोकांनी गर्दी केली. हळूहळू मयताचे नातेवाईकही जमले. त्यानंतर काहींनी आरोपीस मारहाण केली.
तोपर्यंत पोलीसही दाखल झाले होते. त्यांनी आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. अवघ्या एक किमी अंतरावर असलेल्या शेवाळा येथील नागरीकही मागोमाग तेथे धडकले. आरोपीस वाहनातून हलवित असताना ते वाहनावर चालून गेले. मात्र, पोलिसांनी शिताफीने आरोपीला कळमनुरीला हलविले. आरोपीला आमच्या ताब्यात द्या म्हणून ग्रामस्थांनी आखाडा बाळापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला.
बायपासही अडविला आहे. दुपारी १ वाजेपर्यंत हा गोंधळ सुरु होता. उपविभागीय अधिकारी किशोर कांबळे बाळापुरात दाखल झाले असून नातेवाईकांच्या भावना जाणून घेत आहेत.
मृत हे पाणीपुरवठा योजनांच्या गळती दुरुस्तीची कामे करतात. मृत नरवाडे यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहेत. शेखने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे मात्र अजून कळाले नाही. सध्या आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दिवसाढवळ्या भर चौकात घडलेल्या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत