गेमिंग अॅप घोटाळा : ईडीकडून कोलकात्यात ६ ठिकाणी छापेमारीत कोट्यवधींची रक्कम जप्त
गेमिंग अॅप घोटाळा : ईडीकडून कोलकात्यात ६ ठिकाणी छापेमारीत कोट्यवधींची रक्कम जप्त
वृत्तसंस्था कलकत्ता-मोबाइल गेमिंग अॅप घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) कोलकात्यातील सहा ठिकाणी छापेमारी केली आहे. आतापर्यंत १७ कोटी रुपये जप्त करण्यात आले असून अद्याप पैशांची मोजणी सुरू आहे. शनिवारी ईडीच्या पथकाने कोलकाता येथील गार्डन रीच भागातील उद्योगपती आमिर खानच्या घरावर छापा टाकला. या छापेमारीत ईडी अधिकाऱ्यांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे.
आतापर्यंत नेमकी किती संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे, याची अधिकृत माहिती मिळाली नाही. छापेमारीचं काम अद्याप सुरू असून कॅश मोजणी यंत्राद्वारे रोकड मोजली जात आहे. जप्त केलेले पैसे घेऊन जाण्यासाठी अनेक पेट्या आरोपी आमिर खानच्या घरी आणल्या आहेत. ईडीकडून छापेमारी सुरू असताना बाहेर केंद्रीय सैन्य तैनात करण्यात आलं आहे.
‘ई-नगेट्स’ (E-Nuggets) नावाच्या मोबाईल गेमिंग अॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी आमिर खान आणि इतर काही आरोपींविरोधात फेडरल बँकेच्या अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. संबंधित तक्रारीनंतर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकं प्रकरण काय?ईडीने जारी केलेल्या निवेदनानुसार, आरोपी आमिर खानने ‘ई- नगेट्स’ नावाची मोबाईल गेम लॉंच केली होती. ही गेम डाऊनलोड करणाऱ्यांना सुरुवातीच्या काळात विविध ऑफर्स आणि बक्षिसे देण्यात आली. संबंधित रक्कम गेमच्या वॉलेटमध्ये जमा व्हायची, ही रक्कम सुरुवातीला वापरकर्त्यांना कोणत्याही अडचणींशिवाय काढता येत होती. अशाप्रकारे गेमिंग कंपनीने वापरकर्त्यांचा विश्वास जिंकला.
यानंतर वापरकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात कमिशनची टक्केवारी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. संबंधित अॅपच्या वॉलेटमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्यानंतर ही रक्कम काढण्यास अडथळे येऊ लागले. कंपनीकडून सिस्टम अपग्रेडेशन आणि इतर कारणं सांगून वॉलेटमधून रक्कम काढण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर, वापरकर्त्यांचे प्रोफाइल आणि सर्व डेटा संबंधित अॅप सर्व्हरवरून डिलीट करण्यात आला, त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत