वसई परिसरात केळीच्या पानातून नागरिकांना रोजगार
वसई परिसरात केळीच्या पानातून नागरिकांना रोजगार
लेवाजगत न्यूज वसई : गणेशोत्सवसारख्या सणसुदीच्या दिवसांत, लग्नसराई, तसेच पितृपक्षात जेवणावळीसाठी केळीच्या पानांचा विशेष करुन वापर केला जातो. वसईची केळी ही प्रसिद्ध असल्यामुळे वसईच्या विविध ठिकाणच्या भागात या दिवसांत केळीच्या पानांना मोठी मागणी असते. आता गणेशोत्सवाचे दिवस सुरू असल्यामुळे केळीच्या पानांची खरेदी-विक्री मोठय़ा प्रमाणात होत असून ग्रामस्थांना रोजगाराची संधीही उपलब्ध झाली आहे.
गणेशोत्सवात केळीच्या पानांचा वापर हा जेवणासाठीची पत्रावळी म्हणून केला जातो. त्यामुळे या काळात या पानांना अधिक मागणी असते. मागील काही दिवसांपासून गणेशोत्सव सुरू झाला असल्याने ग्रामीण भागात केळीच्या पानांची मागणी वाढत आहे. ग्रामीण भागात राहणारे ग्रामस्थ रानात जाऊन केळीची पाने जमा करून त्याची दारोदारी फिरून व बाजारात जाऊन विक्री करू लागले आहेत. यामुळे यातून दोन पैसे हाती येऊ लागले आहेत.
केळीची पाने गोळा करून त्याचा भारा तयार केला जातो साधारणपणे एका भाऱ्यामध्ये ३५ ते ४० पाने एकत्रित केलेला भारा हा तीनशे ते साडेतीनशे रुपयांना विक्री केला जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. काही ठिकाणी आधीच पानांची मागणी केली जात असल्याने त्यांच्या आवश्यकतेनुसार ही पाने आणून दिली जात आहेत.
तसेच केळीच्या पानात पौष्टिक घटक व गुणधर्म असल्याने केळीची पान हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गरमागरम जेवण केळीच्या पानावर वाढल्यानंतर त्याचा सुगंधही जेवणात मिसळतो त्यामुळे जेवतानाही अधिक प्रसन्न वाटते. तसेच केळीचे पान हे पर्यावरणाला पूरक असून जेवणानंतर फेकून दिल्यास त्याचे सहज विघटन होते. त्यामुळे केळीच्या पानांचा वापर जेवणावळीसाठी होत आहे.
कागदी पत्रावळय़ाही बाजारात
सुरुवातीला वसईच्या विविध ठिकाणच्या भागात गणेशोत्सवात केळीची पाने पत्रावळी म्हणून वापरली जात होती. परंतु बदलत्या काळाच्या ओघात कागदी व इतर साहित्यापासून बनविल्या जाणाऱ्या पत्रावळय़ा बाजारात आल्या आहेत. त्यामुळे केळीच्या पानांचा वापर कमी होत आहे. आता काही ठिकाणीच ही पाने वापरली जात आहेत असे जरी असले तरी गणेशोत्सवात केळीच्या पानांचे महत्त्व अजूनही टिकून आहे असे एका विक्रेत्याने सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत