वडोदऱ्यात गणपती मिरवणुकीत दगडफेक
वडोदऱ्यात गणपती मिरवणुकीत दगडफेक
वृत्तसंस्था वडोदरा -गुजरातच्या वडोदरा येथे गणेशमूर्ती स्थापनेसाठी नेत असताना दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या १३ जणांना ताब्यात घेतले असून एफआयआरही नोंदवला आहे.
ही घटना वडोदरातील मांडवीजवळील पाणीगेट भागातील आहे, तेथे सोमवारी रात्री ११ते १२वाजेच्या दरम्यान दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री काही लोक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी घेऊन जात होते. त्याचवेळी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला, त्यात एका व्यक्तीने दुसऱ्यावर दगडफेक केली.
जवळून जाणाऱ्या दुसऱ्या समाजातील व्यक्तीला दगड लागला, त्यानंतर दगडफेक सुरू झाली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात दगडफेक आणि हाणामारी झाल्याचे दिसत आहे.
दगडफेक करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
या घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडफेक करणारे हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत. शहरातील इतर भागात तणाव पसरू नये म्हणून पोलिसांनी संवेदनशील भागात गस्त वाढवली आहे.
पोलीस म्हणाले- अफवांवर लक्ष देऊ नका
वडोदरा पोलिसांचे सहआयुक्त चिराग कोराडिया यांनी सांगितले की, “गणपतीच्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये मारामारी झाली. सध्या येथे शांतता आहे. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी अफवांवर लक्ष देऊ नये. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत