पतिपत्नीने तापीच्या पुलावरून उडी घेऊन संपवले जीवन
पतिपत्नीने तापीच्या पुलावरून उडी घेऊन संपवले जीवन
लेवाजगत न्यूज भुसावळ- मागील १० वर्षांपासून आजारपण आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून बामणोद ( ता.यावल ) येथील शेतकरी दाम्पत्याने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली . सोमवारी भुसावळ येथील तापीच्या पुलावर दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली . त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला . वसंत वासुदेव नेमाडे ( वय ६३ ) , मालतीबाई वसंत नेमाडे ( वय ५५ ) अशी दोघांची नावे आहेत . ते रविवारी दुपारी बामणोद येथील राहत्या घरापासून दुचाकीने बाहेर पडले होते . सोमवारी ( दि . २९ ) सकाळी तापी नदीपात्रात बेवारस दुचाकी उभी असल्याची माहिती भुसावळ शहर पोलिसांना मिळाली . त्यानुसार दुचाकीची पाहणी केल्यानंतर भुसावळ शहरातील तापी पात्रातील राहुलनगर घाटाजवळ दोघांचे मृतदेह तरंगताना दिसून आले . स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने हे मृतदेह बाहेरकाढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले . पोलिसांनी केलेल्या तपासात दोन्ही मृतदेह बामणोद येथील दाम्पत्याचे असल्याचे स्पष्ट झाले . मालतीबाई या गेल्या १० वर्षांपासून आजारी होत्या . घरची परिस्थिती बेताची असून , या परिवाराने आपली शेती निम्मे हिश्श्याने कसण्यासाठी दिली आहे . तसेच मुलगा आणि सून हे दोन्हीही डॉ .उल्हास पाटील महाविद्यालय व रुग्णालयात रोजंदारीवर काम करतात . शिवाय वसंत नेमाडे यांच्याकडूनही वृद्धापकाळामुळे काम होत नव्हते . परिणामी , त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच होती . अशा परिस्थितीला कंटाळून या दाम्पत्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे , असा पोलिसांचा कयास आहे .
भुसावळातील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटरमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी बामणोद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात एक मुलगा , सून , दोन विवाहित मुली असा परिवार आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत