Header Ads

Header ADS

जाॅगिंग ट्रॅकवर भरधाव कारने निष्पाप बालकाचा घेतला बळी

जाॅगिंग ट्रॅकवर भरधाव कारने निष्पाप बालकाचा घेतला बळी


जाॅगिंग ट्रॅकवर भरधाव कारने निष्पाप बालकाचा घेतला बळी

लेवाजगत न्यूज जळगाव - मेहरूण तलावाच्या काठी असलेल्या जाॅगिंग ट्रॅकवर जिथे रोज शहरातील शेकडो प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या व्यक्ती शरीरस्वास्थ्यासाठी पायी फिरतात त्या ट्रॅकवर रविवारी दुपारी दोन कारमध्ये वेगाने पुढे जाण्याची शर्यत लावण्यात आली आणि त्यात ११ वर्षीय निष्पाप बालकाचा बळी गेला. भरधाव कारने सायकलवर असलेल्या या मुलाला दिलेली धडक इतकी भीषण होती की तो सायकलसह २० ते २५ फूट उंच उडाला आणि खाली पडून जागीच गतप्राण झाला. दोन्ही कारचालक पळून जाण्यात यशस्वी झाले असून, एका कारमधील तिघा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

    रामेश्वर काॅलनीत राहणारा विक्रांत संतोष मिश्रा असे बळी गेलेल्या मुलाचे नाव आहे. तो त्याचा चुलतभाऊ जितेंद्रबरोबर तलावाच्या काठी असलेल्या ट्रॅकवर सायकल चालवण्यासाठी आला होता. दुपारी तीन वाजेनंतर घराकडे परतत असताना ट्रॅकवर एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी भरधाव निघालेल्या दोनपैकी एका कारने (क्रमांक एमएच १९ बीयू ६६०६) विक्रांतला जोरदार धडक दिली. त्यामुळे तो सायकलसह उंच फेकला गेला आणि झाडावर ठोकला गेला. त्याची सायकल झाडावर अडकली; पण तो मात्र खाली पडला. डोक्याला मार लागल्यामुळे त्याची शुद्ध हरपली. तिथे फिरायला आलेल्या लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. 

     एकुलता एक मुलगा गेला

विक्रांत हा अजिंठा चाैफुलीजवळील सुरेशदादा शाॅपिंग काॅम्प्लेक्समध्ये इलेट्राॅनिक्सचे दुकान चालवणारे संताेष मिश्रा यांचा एकुलता एक मुलगा हाेता. विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता चाैथीत ताे शिक्षण घेत हाेता. त्याच्या या अकाली मृत्यूने कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. 

    स्वयंचलित वाहनांना पदपथावर प्रवेश कसा?

या घटनेने मेहरूण तलावाच्या काठावरील ट्रॅकवर स्वयंचलित वाहनांना प्रवेश करता येणार नाही अशी व्यवस्था करण्याची गरज निर्माण केली आहे. यातून महापालिका प्रशासनाने धडा घेतला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. 

    शवविच्छेदन आज : विक्रांतच्या डाेक्याला जबरदस्त मार लागला असून उजव्या कानाच्या मागे जखम झाली आहे. संध्याकाळ झाल्याने त्याचे शवविच्छेदन साेमवारी सकाळी हाेणार आहे. एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक अमाेल माेरे यांच्यासह पथक रुग्णालयात दाखल झाले हाेते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नाेंदवण्यात येत होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.