भाजपा नेत्याने आदिवासी महिलेस शौचालय चाटण्यास भाग पाडले
भाजपा नेत्याने आदिवासी महिलेस शौचालय चाटण्यास भाग पाडले
वृत्तसंस्था झारखंड-भारतीय जनता पार्टीच्या एका महिला नेत्यानं घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेला शौचालय चाटण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीमा पात्रा असं गुन्हा दाखल झालेल्या भाजपाच्या महिला नेत्याचं नाव आहे. हे गंभीर आरोप झाल्यानंतर भाजपानं सीमा पात्रा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
आरोपी सीमा पात्रा या झारखंडच्या रहिवासी असून त्या माजी आयएएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. मागील आठ वर्षांपासून आरोपी सीमा पात्रा पीडित आदिवासी महिला सुनीता यांचा छळ करत होत्या. त्यांनी पीडित महिलेला आपल्या जीभेनं चाटून शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय पीडित महिलेच्या शरीरावर अनेक जखमाही आढळल्या आहेत. आरोपी सीमा पात्रा यांनी आपल्याला गरम वस्तूंने चटके दिल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. याबाबतचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.
आरोपी सीमा पात्रा यांचा मुलगा आयुष्मान यानं पीडित महिलेला वाचवलं आहे. त्यानेच सर्वप्रथम घरात घडणाऱ्या कृत्याची माहिती आपला मित्र विवेक बस्के याला दिली. त्यानंतर पीडितेनं तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती विवेक यास दिली. यानंतर आयुष्मानने विवेकच्या मदतीने पीडितेची सुटका केली. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच रांचीतील अरगोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, काँग्रेसने आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या घटनेला आता राजकीय वळण लागलं आहे. याशिवाय राष्ट्रीय महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी एक निवेदन जारी करत या घटनेचा निषेध केला आहे. पीडित महिलेने केलेले आरोप खरे असल्यास आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी शर्मा यांनी केली आहे. तसेच पीडित महिलेला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत आणि तिचं सुरक्षित पुनर्वसन करण्यात यावं, अशी मागणीही रेखा शर्मा यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत