आईवडिलांसह दोन मुलांची हत्या नांदगाव तालुक्यातील घटना
आईवडिलांसह दोन मुलांची हत्या नांदगाव तालुक्यातील घटना
मनमाळ प्रतिनिधि:- आईवडिलांसह दोन लहान मुलांची झोपेतच तीक्ष्ण हत्याराचे वार करत हत्या करण्यात आली. वाखारी येथे गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण नांदगाव तालुका हादरला आहे.
या हत्याकांडात समाधान चव्हाण (३७), त्यांची पत्नी भरताबाई चव्हाण (३२) आणि गणेश (सहा), आरोही (चार) या मुलांना ठार करण्यात आले. वाखारीजवळील जेऊर शिवारात समाधान चव्हाण हे पत्नी आणि दोन लहान मुलांसह राहत होते. गुरुवारी सायंकाळी जेऊर गावातील मधुकर सांगळे यांच्याकडे समाधान हे कांदे भरण्यासाठी आपली मालवाहू रिक्षा घेऊन गेले होते. काही कांदे भरून झाल्यानंतर उर्वरित माल शुक्रवारी भरण्यात येणार होता. त्यामुळे पहाटे पाचपासून सांगळे हे समाधान यांना दूरध्वनी करत होते. परंतु, समाधान यांच्याकडून प्रतिसाद येत नसल्याने सकाळी सांगळे हे समाधान यांच्या घरी गेले असता समाधान आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब घराच्या ओसरीतील खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. समाधान यांनी जेऊरचे सरपंच राजूभाऊ बोडके आणि वाखारीचे पोलीस पाटील चव्हाण यांना त्यासंदर्भात कळविले. पोलीस पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली.
नांदगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनमाडचे उपविभागीय अधिकारी समीरसिंग साळवे हे देखील आले. चव्हाण दाम्पत्यासह दोन्ही मुलांवरही हत्याराचे वार करण्यात आल्याचे दिसून आले. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत