कोरोनाच्या काळात एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स व दुरसंचाराचे महत्त्वाचे योगदान-प्रा संतोष अग्रवाल
कोरोनाच्या काळात एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स व दुरसंचाराचे महत्त्वाचे योगदान-प्रा संतोष अग्रवाल
(भुसावळ प्रतिनिधी दि७) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतील तांत्रिक प्रगतीने आज दैनंदिन जीवन शैलीत आमूलाग्र बदल केला आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे ही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीनंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन ही एक आवश्यक शाखा म्हणून नावारूपास आली आहे. कोरोना संसर्ग काळामध्ये आपल्याला एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स शाखेने फार महत्त्वाचे योगदान दिले आहे त्यामुळे आपण त्याचे महत्त्व नाकारू शकत नाही अशी माहिती भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम विभागाच्या वतीने आयोजित चर्चा सत्रात प्रा.संतोष अग्रवाल यांनी दिली. चर्चा सत्राच्या दुसऱ्या दिवशी बदलती जैव वैद्यकीय परिस्थितील तंत्रज्ञान या विषयावर मंथन झाले.
बदललेल्या जैववैद्यकीय परिस्थितीत जगाचा गाडा ओढण्याची जवाबदारी सर्वस्वी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तंत्रावर असणार आहे माणसामाणसातील संवादच नाही तर एक संगणक ते दुसरा संगणक, एक यंत्र ते दुसरे यंत्र यातील संवादाची गती प्रचंड वाढणार आहे. माणसांना तसेच कामगार व तंत्रज्ञांना वस्तू, उपकरणांशी, यंत्रांशी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व सेन्सर्सच्या माध्यमातून संवाद साधावा लागणार आहे. मागील दोन दशकांच्या दरम्यान माणसातील भ्रमण(मोबाईल) व दुरुस्त(डिस्टट) संवादाने बाळसे धरत आज ५ जीच्या माध्यमातून तांत्रिक उत्क्रांतीची वाट धरली आहे. तसेच आता माणूस, यंत्र व उपकरणांशी इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या माध्यमातून संवाद साधायची बीजे रोवली गेली आहेत. येणाऱ्या दोन दशकात टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर हे तंत्रज्ञान व उद्योगाचा चेहरा बदलणारे मोठे प्राईम मूवर्स असतील. तंत्रज्ञान व उद्योगच नाही तर शैक्षणिक व सामाजिक पातळीवरही ही इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम शिवाय पर्याय नसेल असे स्पष्ट मत प्रा.अग्रवाल यांनी मांडले.
दूरसंचार क्षेत्रातील क्रांतिकारी बदल असंख्य घटकांना व्यापणार: प्रा.गजानन पाटील
दूरसंचार क्षेत्रातील क्रांती एवढी मोठी होणार आहे की यापुढे वाहने एकमेकांच्या आणि रस्त्यावरील सिग्नल यंत्रणेच्या संपर्कात राहून अपघातांवर नियंत्रण मिळवता येईल. मशीन आपसात ताळमेळ साधून उत्पादन प्रक्रिया पार पाडतील. फोन डायल किंवा डॉक्युमेंट डाऊनलोड करायला मानवी हस्तक्षेपाची गरज नसेल. दूरसंचार तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेली एक इलेक्ट्रॉनिक चीप सारी कामे ऑटोमॅटिक करतील. दूरसंचार क्षेत्रात होणारे क्रांतिकारी बदल आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान, दळणवळण यासह दैनंदिन जीवनातील असंख्य घटकांना व्यापून टाकणार आहेत अशी माहिती प्रा.गजानन पाटील यांनी दिली.
सर्वांनीच कोरोनाच्या विपरीत काळ अनुभवला आणि अनुभवत आहोत. यापुढे दैनंदिन जीवनातल्या अनेक घटक या यंत्रणेच्या माध्यमातून जोडले जाणे शक्य होईल, त्या परिस्थितीत असंख्य कामांसाठी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची गरज शिल्लक राहणार नाही. मशीन टु मशीन संपर्क दहा पटीने वाढेल आणि हे फक्त इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम तंत्रज्ञानाने शक्य होईल असेही ते म्हणाले. विभागप्रमुख डॉ.गिरीश कुळकर्णी उद्या शेवटच्या दिवशी मार्गदर्शन करणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत