Header Ads

Header ADS

श्री राममंदिर भूमीपूजनास कॉग्रेसचे समर्थन तर ओवेसी ची टीका


 

श्री राममंदिर भूमीपूजनास कॉग्रेसचे समर्थन तर ओवेसी ची टीका 
(नवी दिल्ली वृत्त सेवा.)अयोध्येमध्ये राम मंदिराचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. मात्र, या सोहळ्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने मंगळवारी अखेर मौन सोडले असून राम मंदिराचे भूमिपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुत्व आणि सांस्कृतिक संगमाचे प्रतीक असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली.

उत्तर प्रदेशमधील काँग्रेसची जबाबदारी असलेल्या प्रियंका यांच्या विधानाद्वारे पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील सदस्याने राम मंदिर उभारणीचे जाहीरपणे समर्थन केले आहे. राम सगळ्यांबरोबर असतो. सभ्यपणा, धाडस, त्याग, वचनाला जागणारा, करुणामय राम हे जीवनाचे सार आहे, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
प्रियंका यांच्या विधानावर ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली. कट्टर हिंदुत्ववादी विचार स्वीकारणे खूप चांगली गोष्ट आहे, अशी उपहासात्मक टिप्पणी त्यांनी केली. बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेतील पक्षाचा ‘सहभागा’चे श्रेय घ्यायला लाजू नका, असाही टोमणा त्यांनी लगावला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भूमिपूजनाला विरोध केला आहे. ५ ऑगस्ट हा अशुभ दिवस असून निव्वळ पंतप्रधानांच्या आग्रहाखातर हा सोहळा बुधवारी होत आहे. हिंदुत्व धर्माचे पालन होत नसल्याने भाजपच्या नेत्यांना करोनाचा बाधा होत असल्याचेही ते म्हणाले होते. मात्र, दिग्विजय यांचे मध्य प्रदेशमधील सहकारी व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भगवी वस्त्रे घातलेले छायाचित्र आपल्या ट्विटर हँडलवर ‘प्रोफाइल फोटो’ म्हणून लावले असून त्याद्वारे राम मंदिराच्या उभारणीचे स्वागत केले आहे.

भूमिपूजनाच्या या सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रसारण केले जाणार असून त्याला भाकपचे खासदार विनय विश्वम यांनी विरोध केला  आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही, करोनाच्या काळात भूमिपूजन करण्यास विरोध केला आहे. केंद्र सरकारचे प्राधान्य करोना आटोक्यात आणणे असल्याचे पवार म्हणाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.