अयोध्या सविस्तर वृत्त -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. मोदी,भागवत,योगी काय म्हणाले
(वृत्त सेवा )पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. या भूमिपूजन सोहळ्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्याचा उल्लेख केला. अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी भारतामधील सर्व सामान्यांनी सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी सर्वच देशवासियांचे कौतुक केलं. यावेळेस त्यांनी प्रभू रामचंद्रांना अगदी वानरांपासून खारीने मदत केली होती असा दाखलाही दिला. याचबरोबर मोदींनी काही ऐतिहासिक संदर्भ देत महान व्यक्तींना सामान्यांना केलेल्या सहकार्यमुळेच मोठे कार्य करता आले असं नमूद केलं. याचवेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला.
"अयोध्येमधील राम मंदिराबरोबर नवीन इतिहास रचला जात आहे त्याचबरोबर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. ज्याप्रमाणे खारीपासून वानरांपर्यंत आणि नावाड्यापासून ते वनामध्ये राहणाऱ्यांपर्यंत सर्वांना प्रभू रामचंद्राच्या विजयामध्ये सहभागी होण्याचे सौभाग्य मिळालं. लहान लहान मुलांनी भगवान श्री कृष्णाला गोवर्धन पर्वत उचलल्याच्या परक्रमामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पडली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थपानेसाठी मावळ्यांनी सहकार्य केलं, महाराज सोहेलदेव यांना लढाईमध्ये गरिबांनी आणि मागासलेल्या लोकांनी मदत केली, दलित, मागास, आदिवासींबरोबरच सर्वच स्तरातील लोकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात गांधीजींनी सहकार्य केलं, त्याचप्रमाणे आज देशभरातील लोकांच्या सहकार्यामुळे राम मंदिराच्या उभारणीचे हे पवित्र काम सुरु झालं आहे," असं मोदी आपल्या भाषणामध्ये म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. भूमिपूजन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. नरेंद्र मोदींनी यावेळी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभारी मानले. राम मंदिराच्या टपाल तिकीटाचंही मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. आज प्रभू रामाचा जयघोष संपूर्ण जगभरात होत आहे असं सांगत मोदींनी सर्व देशवासी आणि जगभरात असलेल्या भारतभक्त आणि रामभक्तांना शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदींनी सियावर रामचंद्र की जय घोषणेने आपल्या भाषणाला सुरुवात केली.
शरयू नदीच्या काठावर सुवर्ण इतिहास लिहिला गेला आहे असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. मंदिराच्या भूमिपूजनाचा आमंत्रण का स्वीकारलं हे सांगताना पंतप्रधान मोदींकडून रामकार्य केल्याशिवाय मला आराम मिळत नाही अशी भावना व्यक्त केली. "आज संपूर्ण भारत राममय झाला आहे. संपूर्ण देश रोमांचित आहे, प्रत्येकजण भावूक आहे. कित्येक दशकांची प्रतिक्षा आज संपत आहे. करोडो लोकांना आज आपण हा क्षण जिवंतपणी पाहू शकत आहोत यावर विश्वासच बसत नसेल," असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं. संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाली असंही ते म्हणाले आहेत.
सर संघचालक मोहन भागवत
अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मोहन भागवत यांनी संबोधित केलं.
सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यापासून मंदिराच्या कामाला सुरूवात कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर मंदिराची पायाभरणी झाली असून, लवकरच कामालाही सुरूवात होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त बोलताना सरसंघचालक भागवत म्हणाले, "आनंदाचा क्षण आहे. एक संकल्प घेतला गेला होता. देवरसजींनी सांगितलं होतं की, २०-३० वर्ष काम करावं लागेल. तेव्हा हे पूर्ण होईल. प्रयत्न केले. अनेकांनी बलिदान दिलं. पदयात्रा करणारे आडवाणीही आज घरातून हा कार्यक्रम बघत असतील. अनेकजण उपस्थित राहू शकले असते, पण परिस्थिती तशी नाहीये. जगाचं कल्याण करणारा भारत स्वतःच्या कल्याणाचा शुभारंभ आज आणि या व्यवस्थेचं नेतृत्व ज्यांच्या हाती आहे, त्यांच्या हस्ते होतेय. याचाही आनंद आहे," असं भागवत म्हणाले
प्रभु श्रीराम यांच्या चरित्रातील पुरुषार्थ आपल्या कणाकणात आहे. आपल्या सगळ्यात राम आहे. इथे भव्य मंदिर बनेल. सगळी प्रक्रिया सुरू झाली आहे. दायित्व दिलेलं आहे. आता आपल्या सगळ्या मनातील अयोध्येला सजवायचं आहे. सगळ्यांची उन्नती करणारा धर्म, त्याचा ध्वज खांद्यावर घेऊन सगळ्या विश्वाला सुखशांती देणारा भारत आपण निर्माण करू शकू, त्यासाठी आपल्याला मनातील अयोध्या बनवायची आहे. जसं जसं मंदिर बनत जाईल, तसं तसं हे करायचं आहे. राम मंदिर उभं राहण्याआधी आपलं मन मंदिर तयार व्हायला हवं. त्याची गरज आहे," असं भागवत यावेळी म्हणाले.
योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री
राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. संपूर्ण देशाचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागलं होतं. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित करताना ५०० वर्षांपूर्वीच्या स्वप्नाची पूर्तता होत असल्याची भावना व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत